संवाददाता ब्रिजेश बडगुजर: पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू करत विरोधकांना एकामागोमाग एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे,शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख तथा शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.या प्रवेशामुळे ठाकरे गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये भाजप आणि शिवसेनेतील (शिंदे गट) काही नगरसेवकांचा मंगळवारी प्रवेश झाला. त्यामध्ये एक प्रवेश लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा सावळे यांना पक्षात प्रवेश दिला आहे.

२०१७ मध्ये महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आल्यानंतर सीमा सावळे यांना भाजपने पहिल्याच वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद दिले होते. या पदावर बसणाऱ्या व्यक्तीकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असतात, असे मानले जाते. या तिजोरीच्या चाव्या घेऊन सीमा सावळे यांनी महापालिकेत कधी नव्हे तो भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. सीमा सावळे यांच्या कार्यकाळात तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे अनेक पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी वेळोवेळी माध्यमांसमोर मांडले होते. एवढेच नाही तर माजी नगरसेवक मारूती भापकर यांनीही सीमा सावळे यांच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात महापालिकेच्या प्रत्येक कामाच्या मंजुरीत झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी सादर केले होते.